कळंब 
नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शिवसेनेत नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. पक्षाकडून तब्बल चार जणींची उमेदवारीची मागणी पुढे आली असून, अखेर नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कळंब शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नगरसेवकांच्या आरक्षणासह महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सरळ लढत होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपाई (आठवले गट) यांनी स्वतंत्रपणे तयारी सुरू केल्याने युतीत अंतर्गत धुसफूस निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
शिवसेनेची नुकतीच बैठक पक्ष नेते अजित पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत नगर पालिका निवडणुकीतील रणनिती, प्रभागनिहाय चर्चा, तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
चार जणींची दावेदारी.. 
शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी चार जणांनी औपचारिक दावेदारी दाखल केली आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी कापसे यांच्या पत्नी सुनंदा कापसे, माजी उपनगराध्यक्ष मुस्ताक खुरेशी यांच्या पत्नी रीजवाना खुरेशी, शिवसेना शहरप्रमुख गजानन चोंदे यांच्या मातोश्री आशालता चोंदे आणि शोभा प्रकाश चोंदे यांच्या नावाची पक्षाकडे मागणी करण्यात आली आहे.
या दावेदारांपैकी कोणाचा वरचष्मा ठरणार आणि पक्षश्रेष्ठींचा निर्णय कोणाच्या बाजूने लागणार यावर सध्या शिवसैनिकांचे, तसेच शहरातील नागरिकांचेही लक्ष केंद्रित झाले आहे. नगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार कोण ठरणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
			










