कळंब
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वबळाचा बिगुल फुंकत आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. महायुतीतील घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही मैदानात उतरल्याने कळंबचे राजकारण तापले आहे.
शहरातील पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व २० नगरसेवक पदांसह नगराध्यक्ष पदाची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा ठाम निर्धार करण्यात आला. या निर्णयामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल झाली असून विरोधकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भास्कर खोसे, तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे, कार्याध्यक्ष अॅड. प्रवीण यादव, महिला जिल्हाध्यक्ष सरला खोसे, युवक तालुकाध्यक्ष अमर मडके उपस्थित होते. मान्यवरांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
बैठक शहराध्यक्ष दत्तात्रय तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आगामी निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करत प्रत्येक प्रभागात पक्षसंघटन मजबूत करण्याचे आणि मतदारांशी थेट संवाद वाढवण्याचे निर्देश देण्यात आले. इच्छुक उमेदवारांशी सविस्तर चर्चा करत उमेदवारी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
विशेष म्हणजे या बैठकीत ओबीसी आरक्षित जागांवर ओबीसी समाजातील पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा निर्णयाचा राष्ट्रवादी ला किती प्रमाणात फायदा होतो हे पुढील काळात समजणार आहे.
या प्रसंगी युवक प्रदेश चिटणीस शंतनू खंदारे, शहराध्यक्ष विक्रम चोंदे, जिल्हाध्यक्ष सुहास मेटे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल, युवक सोशल मीडिया युवक शहर उपाध्यक्ष अभिजीत हौसलमल, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मुस्तफा शेख, शहराध्यक्ष सोहेल शेख, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नितीन ठानअंबिर, तसेच अनिशुद्दीन काझी, अभिजीत कदम, हमीद खान, रंजीत घुले, अशोक ईके आणि खंडू निंगोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवून सत्तेचा गड काबीज करू असा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या या आत्मविश्वासपूर्ण घोषणेमुळे विरोधकांच्या छावण्यांत चिंतेची लाट पसरल्याचे दिसून येत आहे.











