राजकीय शतरंज सजू लागली..
कळंब
नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाले असून, आरक्षण जाहीर होताच दिग्गज नेत्यांनी स्वतःऐवजी आपल्या पत्नीला (सौभाग्यवतीला) उमेदवार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सत्तेचा गड घरातच ठेवण्यासाठी राजकीय शतरंज आता सजू लागली आहे.
मागील पंचवार्षिकात हे पद ओबीसी महिलेसाठी राखीव होते. त्या वेळी सुवर्णा सागर मुंडे या नगराध्यक्षा झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात विकासकामांवरून वादंग, सत्ताकारणातील गटबाजी आणि विरोधकांची सततची टीका अशा अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यामुळे यंदा आरक्षण कोणत्या वर्गासाठी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर पुन्हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेक जणांना नवा राजकीय श्वास मिळाला आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरातील राजकारणात जातीपातीचे गणित पुन्हा मांडले जाऊ लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांनी आपापली समीकरणे (समीकरणं) तयार करण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांमध्येही चैतन्य निर्माण झाले असून, सोशल मीडियावर समर्थकांकडून आपलाच नगराध्यक्ष अशा पोस्टनी वातावरण तापले आहे. प्रत्येक गट आपल्या नेत्यांच्या सौभाग्यवतींच्या नावाचा जयघोष करताना दिसत आहे. पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे बदलू शकतात, नव्या आघाड्यांची तटबंदी होऊ शकते आणि काही आश्चर्यकारक नावेसुद्धा पुढे येऊ शकतात. कळंबचे राजकारण पुन्हा एकदा रंगात आले आहे, आणि शहरातील जनतेच्या चर्चेत एकच प्रश्न घोळतोय नगराध्यक्षा कोण?”
मुंबई वारी…
काही दिग्गज नेत्यांनी नगराध्यक्ष उमेदवारी निश्चित करण्यासाठी थेट मुंबई वारी केल्याची चर्चा सुरू आहे. वरिष्ठांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी संपर्क आणि लॉबिंगची चढाओढ सुरु झाल्याचे दिसते. त्यामुळे कळंब नगर पालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्ता, प्रतिष्ठा आणि संग्राम पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
उमेदवारीसाठी रस्सीखेच
महाविकास आघाडीत नगराध्यक्ष पदासाठी अनेक महिलांची नावे पुढे येत आहेत, तर महायुतीतून फक्त एकच नाव ठळकपणे चर्चेत आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवारीच्या स्पर्धेला वेग आला आहे. पुढे कोणत्या घरात नगराध्यक्षपदाची माळ पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











