शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय’  सहकार मंत्र्यांच्या वक्तव्यावर घणाघाती हल्ला.. 
धाराशिव 
सहकार मंत्र्यांनी केलेल्या ‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय’ या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे नसून, आत्मसन्मानावर थेट आघात करणारे आणि सत्तेचा माज दाखवणारे आहे, असा घणाघाती हल्लाबोल आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केला.
 आयुष्यभर राबून, घाम गाळून देशाची पोट भरणारा शेतकरी आज अतिवृष्टी, दुष्काळ आणि वाढत्या खर्चांमुळे कर्ज घेतो. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि औषधांसाठी कर्ज घेणाऱ्याला नाद लागला म्हणणे म्हणजे त्याच्या वेदनेचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा अपमान आहे, अशा शब्दांत त्यांनी मंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
  शेतकरी भीक मागत नसून, आपल्या घामाच्या आणि श्रमाच्या सन्मानाचा हक्क मागत आहे. सरकारने या अपमानाची दखल न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिला. शेतकरी जेव्हा रागावतो, तेव्हा सत्तेच्या खुर्च्या हलतात आणि राजकारणाचे पाया हादरतात, असे खडे बोल त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. 
सत्तेचा अहंकार नव्हे, तर अन्यायाचा उत्सव 
 पाटील पुढे म्हणाले, सत्तेच्या मखमली खुर्चीत बसल्यावर रानातील चिखल दिसत नाही आणि शेतकऱ्याचा आक्रोश ऐकू येत नाही. निवडणुकीच्या काळात कर्जमाफीचे आश्वासन देणारे नेते आता सत्तेत येताच त्याच मागणीला ‘नाद’ म्हणतात. उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जमाफी करताना संवेदनशीलता जागी होते, पण शेतकऱ्याने हक्क मागितला की त्याला टोचले जाते. हा सत्तेचा अहंकार नसून अन्यायाचा उत्सव आहे.”
			










