नगरपालिका निवडणुक 
कळंब 
अखेर तो महामुहूर्त आलाच, गेल्या सात वर्षांपासून राजकीय उपवास करणाऱ्या कळंबकरांची प्रतीक्षा संपली आणि नगरपालिका निवडणुकीचे नगरसेवक आरक्षण जाहीर झाले. या घोषणेने नुसती खळबळ नाही, तर थेट सोशल मीडियावर राजकीय ज्वालामुखी फुटला आहे. शहराच्या गल्ली-बोळात शांतता असली तरी, कार्यकर्त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर मात्र  पोस्टम-पोस्टी आणि लाईक-टिपणी नावाचे युद्ध जोरात सुरू झाले आहे.
सात वर्षांच्या प्रवासात अनेक नेते तयार झाले आहेत. यांची आतुरता इतकी होती की, आरक्षण जाहीर होताच फेसबुक आणि व्हाट्सॲपवर अक्षरशः डिजिटल धिंगाना सुरी झाला आहे, कोणी नगरसेवक फिक्स म्हणून छाती फुगवत आहे, तर कोणी लावा ताकद म्हणत विरोधकांना व्हर्च्युअल आव्हान देत आहे. नगरपालिकेवर झेंडा फडकणार या घोषणांनी कळंबच्या राजकारणाला अचानक रंग प्राप्त झाले आहेत.
  प्रभाग क्रमांक अमुक मधून कोणत्या भावी  नेत्याचा चेहरा सर्वात जास्त चमकतो हे पाहण्यासाठी लाईक ची स्पर्धा लागली आहे. काही जणांनी तर आमचं ठरलं आणि आम्हीच नगराध्यक्ष ठरवणार अशा स्वप्नरंजनी घोषणांनी वातावरण इतके पेटवले आहे की, प्रत्यक्ष अर्ज भरण्याची तारीख येईपर्यंत शहरात एकही निष्क्रिय कार्यकर्ता शिल्लक राहणार नाही असे वाटते आहे.     सध्याच्या युती-आघाडीच्या गोंधळात नक्की कोण कोणासोबत लढणार हे नेत्यांनाही माहित नाही, पण कार्यकर्त्यांनी मात्र आतापासूनच मीच कसा पुढचा नगरसेवक हे सिद्ध करण्यासाठी गुप्त मोर्चेबांधणी ऐवजी सोशल मीडियावर जाहीर पोस्टबाजी सुरू केली आहे.
 थोडक्यात, कळंबमध्ये आता गल्लीतले भांडण थेट सोशल मीडियावर पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत जेव्हा हे ‘स्क्रीनशॉट वॉर’ प्रत्यक्ष उमेदवारी अर्जांच्या रिंगणात उतरेल, तेव्हा खरी मजा येईल, तोपर्यंत, कळंबकर नागरिकांनो, आपल्या मोबाईलचा डेटा जपून वापरा, कारण आता या ‘डिजिटल धुमश्चक्री’तून तुम्हाला अनेक मनोरंजन मिळणार आहे.
 
			










