चोरट्यांनी शेतकऱ्याला केले लक्ष..
कळंब – तालुक्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेले असताना, आता चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. ईटकुर शिवारातील दोन घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एकूण सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतातील पिक नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कुटुंब चालवणे अवघड झाले आहे. अशा बिकट परिस्थितीतच चोरट्यांनी त्यांचा भांडवलावर डोळा ठेवला.
लहु उत्तरेश्वर गायकवाड (वय ४९, रा. गंभीरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या गट क्रमांक १५२ मधील घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ६० हजार रुपये रोख लंपास केले, ज्याची एकूण किंमत १ लाख १५ हजार रुपये झाली.
याचवेळी, किसकिंदा अंकुश गायकवाड (रा. गंभीरवाडी) यांच्या घरातही घरफोडी झाली. त्यांचे २० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख चोरीला गेले.
या दोन्ही चोरींचा एकूण ऐवज १ लाख ९० हजार रुपये इतका आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.











