कळंब
मुसळधार पावसामुळे कळंब शहरातील अनेक व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त सर्वप्रथम सा. लोकाभिमानच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते. याची दखल घेत पालिका प्रशासनाने पाणी काढण्याचे काम सुरू केले आहे.
शनिवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले. व्यापारी संकुलांमध्ये दुकानांत पाणी शिरल्याने साहित्य खराब झाले असून, काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचेही नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून अद्याप ठोस मदत किंवा पाणी काढण्याची उपाययोजना झालेली नाही, अशी व्यापाऱ्यांची तक्रार होती.
या तक्रारीची दखल सा. लोकाभिमानने घेतली आणि विषय समाजमाध्यमांतूनही गाजला. त्यानंतर व्यापाऱ्यांनी गांधीगिरीच्या पद्धतीने थेट पावसाच्या पाण्यात बसून आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर सा. लोकाभिमानने थेट नगरपालिकेला जाब विचारला.
दखल…
छत्रपती शिवाजी महाराज संकुलातील साचलेल्या पाण्याबाबत मोठ्या नेत्यांनी सा. लोकाभिमानच्या बातमीची दखल घेत पालिका प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ इंजिन बसवून पाणी उपसण्याचे काम सुरू केले आहे. हे इंजिन ३० तारखेपर्यंत तिथेच ठेवून उपसा सुरू ठेवण्यात येणार आहे.











