कळंब
सलग दीड महिन्याच्या मुसळधार पावसाने कळंब तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्नं, घाम आणि काळी मातीच वाहून गेली. पिकं उभं करण्याचा आशेचा किरणही पुराच्या पाण्यात बुडाला. अशा संकटाच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तालुक्यातील दौरा रद्द झाल्याने शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचणार तरी कशी, हा जळजळीत प्रश्न उपस्थित झाला आहे.
सलग दिड महिन्यापासून पाऊस मुसळधार बरसत आहे. कळंब तालुक्यातील मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन अक्षरशः पाण्यावर तरंगताना दिसतंय. तब्बल ६० हजार हेक्टरवरील पीक पाण्यात बुडालं, तर काही ठिकाणी जमीनच खरडून गेली आहे. काळ्या आईचीच माती पुराच्या पाण्यात वाहून गेली. शेतकऱ्यांनी जीव तोडून मशागत केलेली शेतीच आता उरली नाही. पिक गेलं तरी पुन्हा उभं करता येईल, पण जमीनच हातातून निसटली तर आम्ही काय करायचं?” असा हळहळीत प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घोंघावत आहे. ज्या काळ्या आईने आपल्या उदरनिर्वाहाला, संसाराला आधार दिला तीच आज पाण्याच्या तडाख्यात वाहून जाताना पाहणं, हे शेतकऱ्यांसाठी जगण्यापेक्षाही मोठं दु:ख ठरतंय. त्यापाठोपाठ आता घरात सुध्दा पाणी शिरल्यामुळे जिवनाअश्यक वस्तू सुध्दा वाहुन गेल्या आहेत. त्यामुुुळे आता जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
चौकट
तालुक्यातील सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ५८ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिक पूर्णपणे पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचा पेरणीवर केलेला २९७ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च वाहून गेला आहे.
चौकट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परंडा, भूम व त्यानंतर कळंब तालुक्यातील आथर्डी येथे दौरा होता. या करीता प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली होती, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. दुपारी तीन च्या दरम्यान हा दौरा होणार होता. आमदार तानाजीराव सावंत यांच्या मतदार संघातील परंडा तालुक्यातील रुड व भूम पाथ्रुड येथील नुकसानीची पाहणी झाल्यानंतर पुढील कळंब तालुक्यातील आथर्डी येथील दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा समजेल का? अस प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मतदार संघात पाहणी केली, मात्र विरोधी आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या मतदार संघाचा दौरा का? रद्द केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.











