धाराशिव (प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्यात झालेल्या आजवरच्या सरकारमधील सर्वाधिक भ्रष्ट सरकार म्हणून या शिंदे व फडणवीस सरकारची नोंद झाली आहे अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. ते कसबे तडवळा येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील उपस्थित होते.
खासदार राजेनिंबाळकर म्हणाले की, या सरकारने भ्रष्टाचार कुठे आणि किती करावा याची परिसिमाच पार केली. छत्रपतीच्या नावावर मोदींनी मते मागितली आणि त्याच युगपुरुषाच्या पुतळ्यामध्ये यांनी भ्रष्टाचार केला, एवढं दुर्लक्ष केलं की हा पुतळा कोसळला. हा फक्त पुतळा कोसळला नाही तर या राज्यातील जनतेच्या विश्वास गळून पडला. याचं जराही दुःख खेद या सरकारला वाटल नाही. पण या जनतेला वाटलेलं दुःख ते मतपेटीतून व्यक्त करतील असा विश्वास खासदार ओमराजे यांनी बोलून दाखविला.
पुढे ते म्हणाले, मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखं वागत आहेत, आपल्या राज्यावर ते विशेष प्रेम करतात कारण या राज्यात आलेले मोठे प्रकल्प त्यांनी गुजरातला वळवले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येणार आहे. पण हाती काय मिळालं तर भला मोठा काशी भोपळा असा टोमणा खासदार ओमराजे यांनी सरकारला मारला. यावेळी आमदार कैलास पाटील यांनीही केंद्र व राज्य सरकारने महाराष्ट्रावर कसा अन्याय केला याचा पाढा वाचला. या गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे येऊन गेले होते ती जागा हे भव्य स्मारक म्हणून घोषित झाले. पण त्यासंदर्भात असलेली फाईल एक वर्षांपासून मुख्यमंत्री यांच्याकडे पडून आहे. दिवसाला वीस हजार सह्या करणाऱ्या मुख्यमंत्री येथे सही करताना कशाची वाट पाहत होते. ही फाईल अदानी अंबानीची नव्हती म्हणून सही केली नसेल असाही टोला आमदार पाटील यांनी लगावला.